डोंबिवली : डोंबिवलीतील सागाव आणि दिवा येथील शाळांचा विश्वस्त असलेल्या एका शाळा चालकाची मुंबईत मंत्रालयात शिक्षण विभागात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका इसमाने १० लाख ६२ हजार ३२ रूपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन वर्षांच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या शाळांच्या विश्वस्ताने या फसवणूक प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. ॲड. शिवा कृष्णमूर्ती अय्यर (६०) असे तक्रारदार आणि शाळा विश्वस्ताचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील सागाव येथील चेरानगर, रविकिरण सोसायटी भागात राहतात. ॲड. अय्यर आणि त्यांचे सहकारी सागाव येथे जयभारत इंग्लिश हायस्कूल, दिवा येथे साऊथ इंडियन इंग्लिश स्कूल या दोन शिक्षण संस्था २० वर्षापासून चालवितात, असे पोलिसांनी सांंगितले. पोलिसांंनी सांगितले, सागाव येथील जय भारत शाळेत अकरावी, बारावीच्या तुकड्या शाळा चालकांना सुरू करायच्या होत्या. यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाची परवानगी गरजेची होती. दिवा येथील साऊथ इंंडियन शाळेला शासनाकडून दहावीचा इंडेक्स क्रमांंक आवश्यक होता. या दोन्ही परवानग्यांसाठी शाळा चालकांनी शासनाच्या शिक्षण विभागाकडे मंत्रालयात अर्ज दाखल केले होते. या दोन्ही विषयांचा पाठपुरावा आणि हे काम लवकर होण्यासाठी शाळा चालक शिक्षण विभागाशी संंबंंधित मध्यस्थाच्या प्रयत्नात होते. ॲड. अय्यर यांना ठाणे येथील शाळेतील एक विश्वस्त गीता सक्सेन यांनी धनाजी जानराव पाटील (रा. अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटी, टोपाझ, नाशिक) यांचा संदर्भ दिला. पाटील यांना शिक्षण विभागाची खूप माहिती असून ते आपले काम करून देतील असे सांगितले.
शाळेच्या एक विश्वस्त ज्योत्सना अय्यर यांंनी धनाजी पाटील यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. पाटील यांंनी ज्योत्सना यांना शाळेच्या कामाविषयी बोलण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एका हाॅटेलमध्ये बोलविले. ज्योत्सना आणि शेट्टीयार वासवन हे पाटील यांना भेटण्यासाठी संंबंधित हाॅटेलमध्ये गेले. ज्योत्सना यांनी पाटील यांना आमच्या एका शाळेला दहावी, बारावीच्या तुकड्या, एका शाळेला दहावीचा इंडेक्स क्रमांक मिळवून देण्यासाठी आम्हाला शिक्षण विभागाच्या माध्यमातून सहकार्य करा, अशी मागणी केली. पाटील यांनी या दोन्ही कामासाठी काम झाल्यानंतर आपण मला प्रत्येकी आठ लाख रूपयांप्रमाणे एकूण १६ लाख रूपये द्या, असे ज्योत्सना यांना सांगितले. यापूर्वी धनाजी पाटील यांनी शिक्षण विभागातून शिक्षण राज्यमंत्री यांचे पत्र आणून देण्याचे काम केले होते. त्यामुळे पाटील विश्वासाने काम करतील असे शाळा चालकांना वाटले. काम झटपट होण्यासाठी ॲड. शिवा अय्यर यांनी आपल्या बँक खात्यामधून सहा लाख ६२ हजार रूपये आणि रोख स्वरुपात चार लाख रूपये धनाजी पाटील यांना दिले. पैसे दिल्यानंतर ॲड. अय्यर, शाळा चालक काम लवकर होण्याच्या प्रतीक्षेत होते. अय्यर पाटील यांना आपल्या कामाच्या प्रगतीची माहिती नियमित घेत होते. यावेळी पाटील हे करोनाचा प्रसार खूप वाढला आहे. आपले काम रेंंगाळत आहे. त्यानंतर राज्यात नवीन सरकार आले आहे. त्यामुळे कामे पुढे गेलेले नाही, अशी विविध कारणे देत ॲड. अय्यर यांच्या शाळेचे काम करण्यास टाळाटाळ करू लागले. तक्रारदार अय्यर नियमित पाटील यांना संपर्क करून काम झटपट करा म्हणून सांगत होते. पाटील यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन नंंतर ॲड. शिवा अय्यर यांच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. पाटील यांनी आपले शाळांचे काम न करता आपल्याकडून पैसे घेऊन आपली फसवणूक केली. स्वताच्या फायद्याकरिता पैसे वापरून रकमेचा अपहार केला. पाटील यांच्याकडून काम नाहीच पण पैसेही परत मिळणे शक्य नसल्याने शिवा अय्यर यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांंनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.