पुणे : पुण्यात चंदन चोरीतील “विरप्पन” टोळ्यांची दहशत प्रचंड वाढली असून, चोरट्यांच्या वाढलेल्या हिमतींमुळे चंदन चोरीचा आलेख देखील वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ८ महिन्यातच ३४ घटनांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. या चंदन चोर टोळक्यांचे धाडस इतके वाढले की आता नागरिकांवर हल्ले करण्यासोबतच त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन चंदनाची झाडे चोरीला जात असल्याचे गेल्या काही घटनांमधून दिसत आहे.
पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात गाव गुंड, कुख्यात गुंड तसेच दहशतवाद्यांसोबत आता दाक्षिणात्य कुविख्यात चंदन तस्कर विरप्पनचे वारस असल्याची भितीदायक परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. हे चंदन तस्करपुर्वी बंद बंगले, असुरक्षित ठिकाणांवरून गुपचूप चंदनाची झाडे करवतीने कापून चोरून नेत होते. पण, गेल्या काही महिन्यांपासून आता या चंदन चोरट्यांचे धाडस प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.|
सोमवारी मध्यरात्री चंदन चोरट्यांनी पोलिसांवर (बीट मार्शल) हल्ला केला. हल्यानंतर पोलिसांनी चोरांवर गोळीबार केला. दोन गोळ्या झाडल्या, परंतु, चोरट्यांना गोळी लागली नाही. चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. यामुळे पुन्हा एकदा चंदन तस्कारांचा प्रश्न चर्चेत आला आहे. शहरात सलग ३ घटना अशा पद्धतीने घडल्या असून, २ घटना डेक्कन येथे घडल्या आहेत. ऑगस्टमध्ये प्रभात रस्त्यावरील बंगल्यात शस्त्रधारी टोळके शिरले. तेव्हा आवाजाने बंगल्यातून महिला बाहेर आली असता टोळक्याने जीवे मारण्याची धमकी देत बंगल्यातून ७० वर्ष जुने झाड चोरून नेले होते. ७ ते ८ जणांचे टोळके होते. नंतर नुकताच एका बंगल्यातून झाड चोरून नेताना कुटूंबाला धमकावले होते.
शहरात वाढत असलेल्या घटनांमुळे सध्या चंदन चोरणाऱ्या टोळ्यांचे धाडस प्रंचड वाढल्याचे दिसत आहे. दुसरीकडे या घटनांना आवर घालण्यासोबतच टोळ्यांना पकडण्यात पोलिसांना म्हणावे तसे यश येत नसल्याचे दिसत आहे. चोरटे दररोज चंदनाचे झाड चोरून नेत असताना पोलिसांना या टोळ्या सापडत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या ८ महिन्यात ३४ घटना घडल्या असून, त्यातील ११ गुन्हे उघड केले असून, ३६ जणांना अटक केली आहे.
शहर सुरक्षित समजले जाते. सुरक्षा व्यवस्थाही चांगली आहे. पण, सोसायटीचा आवार, शासकीय आवार तसेच इतर भागातून झाडे चोरली जातात. पण, येथे चंदनाची झाडे आहेत, हे नेमक चोरट्यांना समजतेच कसे असा प्रश्न आहे. कारण, झाड मोठ झालं की लागलीच त्यावर डल्ला मारला जातो. चोरीच्या पुर्वी या झाडात ड्रीलने बुंधा तयार झाला आहे का, याची पाहणी करतात. तसेच झाड मोठे व तीन ते चार किलो वजनांपर्यत झाले आहे का हे पाहून चोरी करतात, असे दिसून आले आहे.
चंदनापासून अगरबत्ती व सुंगधी तेल वस्तू बनविले जाते. तसेच, घरगुती होम हवन कार्यासाठी चंदनाच्या लाकडांचा वापर केला जातो. दरम्यान, चंदनाची तस्करी पुणे ते सोलापूर आणि तेथून कार्नाटकात अशी होत असल्याची माहिती आहे. पुण्यासह इतर शहरांमधून चंदनचोरीकरून त्याची आंध्रप्रदेशमध्ये विक्री करणारी टोळीही सक्रिय असल्याची माहिती आहे.