पुणे : कोंढवा परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. जहीर उर्फ साद गनी खान (वय २०), आदनान शाबीर शेख (वय २५, दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथक कोंढवा भागात गस्त घालत होते. कोंढव्यातील ओपेल पलक सोसायटीसमोर दोघे जण थांबले असून, त्यांच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी खान आणि शेख यांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आले. दोघांकडून १४ लाख रुपयांचे ६३ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, अझिम शेख, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ मुक्त पुणे (ड्रग फ्री पुणे ) मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पोलिसांनी गेल्या नऊ महिन्यात साडेतीन हजार रुपये कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. शहरात गांजा, मेफेड्रोन विक्री, तसेच तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. महाविद्यालयीन युवकांना अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या पथकांकडून नजर ठेवण्यात आली आहे. गांज्याच्या तुलनेत मेफेड्रोन महाग आहे. अनेक तरुण गांज्याच्या आहारी गेले आहेत.