मराठी,हिंदी टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, कलाकार शरद पोंक्षे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. पोंक्षे हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आपल्याला जी भूमिका योग्य वाटते त्यावर ते ठामपणे व्यक्त होतात. त्यासाठी त्यांना कित्येकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. आपल्यावर कोण काय बोलते यापेक्षा आपल्याला जे महत्वाचे वाटते ते बिनधास्तपणे सांगायला, बोलायला हवे अशी भूमिका पोंक्षे यांनी नेहमीच घेतली आहे. आता ट्विट्वर त्यांची एक खास पोस्ट चर्चेत आली आहे. आपली लाडकी लेक सिद्धीचं कौतूक करणाऱ्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पायलट झाली आहे. तिनं तिच्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. यानिमित्तानं पोंक्षे यांची पोस्ट कौतूकाचा विषय ठरत आहे.
शरद पोंक्षेच्या ट्विटची होतेय चर्चा..
पोंक्षे यांनी ट्विटरवरुन ती पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे तिनं पार केले आहेत. बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर ती पायलट झाली.