बदलापूर : येथील प्रथितयश आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये तीन वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी बदलापुरात नागरिकांचे रौद्ररूप पाहायला मिळाले. पालक आणि नागरिकांनी सकाळी सहा वाजल्यापासून शाळेसमोर आंदोलन सुरू केले. काही आंदोलकांनी शाळेत तोडफोडही केली. त्यानंतर आंदोलकांनी रेल्वे स्थानकाकडे मोर्चा वळविला. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलकांनी तब्बल १० तास कल्याण-कर्जत रेल्वे मार्ग रोखून धरला. आदर्श शाळेत गेल्या आठवड्यात दोन तीनवर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी वैद्याकीय तपासणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी १२ तास लावले आणि शाळा प्रशासनानेही घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट पसरली. शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर बंदची हाक देत आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत सकाळी सहा वाजल्यापासून शाळेबाहेर पालकांनी निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत करत साडेअकराच्या सुमारास आक्रमक आंदोलकांनी शाळेत प्रवेश केला व वर्ग तसेच शालेय साहित्याची नासधूस केली. त्याचवेळेस काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले व त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला.
बदलापूर रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी विनवणी करूनही आंदोलक हटले नाहीत. अखेर पावणेसहाच्या सुमारास पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. स्थानकाबाहेर आंदोलकांनी काही खासगी गाड्या फोडल्या. अखेर रात्री सव्वाआठच्या सुमारास आंदोलकांना हटविण्यात पोलिसांना यश आले. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलकांनी शहरातील मुख्य रस्ते, उड्डाणपूल बंद केल्याने शहरांतर्गत वाहतुकीलाही फटका बसला. लोकल सेवा बंद पडल्याने प्रवासी अंबरनाथपर्यंत येऊन तेथून रिक्षा किंवा मिळेल त्या वाहनाने बदलापूर गाठण्याचा प्रयत्न करत होते. मात्र शहराचे प्रवेशद्वार बंद केल्याने त्यांना पायपीट करत घर गाठावे लागले. आंदोलनादरम्यान बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विधानाने वाद निर्माण झाला आहे. ‘तू अशा बातम्या देत आहेस, की जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,’ अशा भाषेत त्यांनी एका महिला पत्रकारावर आगपाखड केली. यामुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र आपण असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती. नक्की काय झाले याची माहिती घ्या, असे आवाहन केवळ पत्रकारांना केल्याचा त्यांचा दावा आहे. आंदोलनात महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. राज्यात सुरू असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार सरकारकडून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र ‘लाडकी बहीण योजना, नको तर सुरक्षित बहीण योजना द्या’ अशी मागणी करणारे फलक बदलापूरकरांनी यावेळी झळकविले.