मुंबई : मुंबई महानगरात तापमानात प्रचंड वाढ झाली असून, उन्हाच्या झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यात वाढ झाली आहे. परंतु, मुंबईतील रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेचा ब्रॅड असलेल्या ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याच्या मागणी नुसार पुरवटा कमी झाल्याने, रेलनीर बाटल्या रेल्वे स्थानकातील स्टॉलवर दिसून येत नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेलनीर व्यतिरिक्त मान्यताप्राप्त खासगी बाटलीबंद पाणी विकण्यास परवानगी दिली आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा/कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकात, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकात ”रेलनीर”चा बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, सध्या वाढती मागणी आणि मर्यादित उत्पादन क्षमता असल्याने इतर बाटलीबंद पाणी विकले जात आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते सुरत विभाग आणि मध्य रेल्वेवरील ठाणे ते कर्जत विभागावर रेलनीरचा पुरवठा सध्या मर्यादित केला आहे. मध्य रेल्वेने ऑक्सिमोर एक्वा, रोकोको, एल्विश, इयोनिता, कन्हैय्या, ऑक्सिराइज, ऑक्सिग्रँड, ब्रिओटिन, व्हेनिस ब्लू, केल्विनो, विघ्नहर्ता आरोग्यम्, सनरिच एक्वा, ऑक्सीब्लू, इनव्होलाइफ यासारख्या इतर खासगी बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या स्टाॅलवर विकण्याची परवानगी दिली आहे. अंबरनाथ येथील कारखान्यातून दररोज एक लीटरच्या सुमारे १.७२ लाख पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जातात. तसेच शताब्दी, वंदे भारत एक्स्प्रेससाठी ५०० मिलीच्या पाण्याच्या बाटल्या बनवल्या जातात. तर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकात व उर्वरित इतर रेल्वेगाड्यांमध्ये एक लीटरची पाण्याची बाटल्यांचा पुरवठा केला जातोय.

