ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच त्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या वतीने ‘विशेष गौरव पुरस्कार’ योजना जाहीर करण्यात आली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी तसेच पाल्यांचा या पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात येणार आहे. शैक्षणिक, क्रीडा, कला, आपत्कालीन मदतकार्य तसेच देश किंवा राज्याची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील पात्रतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा इयत्ता १२ वीमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पुढील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणात संबंधित विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी आणि आयआयटी, आयआयएम, एम्स यांसारख्या नामांकित उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या पुरस्कारासाठी पात्रता असेल.
याशिवाय राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणारे खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य आणि इतर कला क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे कलाकार तसेच पूर, जळीत, दरोडा, अपघात किंवा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी बहुमोल योगदान देणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी किंवा पाल्य यांचाही या पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. तसेच देश किंवा राज्याची प्रतिष्ठा वाढविणारे विशेष कार्य करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करावा किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ असून अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे किंवा पालघर येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी ०२२-४५६४१५९३ किंवा ९९२००१६५८० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल. पात्र माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा आणि त्यांच्या पाल्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे-पालघर यांनी केले आहे.

