नवी दिल्ली : हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान, पीएम मोदी आणि मुइज्जू यांनी मालदीवमधील हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी मालदीवमध्ये रुपे कार्डद्वारे पेमेंटही सुरू करण्यात आले. मोदी आणि मुइज्जू यांनी पहिला व्यवहार केला.
बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये संयुक्त निवेदन जारी केले. पीएम मोदी म्हणाले की, “भारत आणि मालदीवमधील संबंध शतकानुशतके जुने आहेत. भारत मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी आणि जवळचा मित्र आहे. आमच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे. आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. एकता हार्बर प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे. आम्ही हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू.”
मालदीवमध्ये सुरू असलेल्या भारतीय प्रकल्पांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, “आज आम्ही परस्पर सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी दृष्टीकोन स्वीकारला आहे. विकास हा आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि आम्ही नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मालदीवच्या आवश्यकतेनुसार आज 400 मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या चलन स्वॅप करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारत आणि मालदीव मुक्त व्यापार करारावरदेखील चर्चा सुरू आहेत. आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तयार आहोत. आज भारताच्या सहकार्याने बांधलेल्या 700 हून अधिक सामाजिक गृहनिर्माण युनिट्स सुपूर्द करण्यात आल्या आहेत.”
मालदीवला मदत करण्यासाठी भारत नेहमीच उभा राहिला आहे: पंतप्रधान पीएम मोदी म्हणाले, “आमच्या नेबरहुड फर्स्ट धोरणात आणि “सागर” व्हिजनमध्ये मालदीवचेही महत्त्वाचे स्थान आहे. भारताने नेहमीच मालदीवसाठी प्रथम प्रतिसादाची भूमिका बजावली आहे. मालदीवच्या लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करणे असो, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिण्याचे पाणी पुरवणे असो किंवा कोविडच्या काळात लस पुरवणे असो, आपला शेजारी म्हणून भारताने नेहमीच आपली जबाबदारी पार पाडली आहे.”
दरम्यान, यावेळी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांनी पीएम मोदींना मालदीव दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले, “आमच्या नवीन सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंटमध्ये विकास, सागरी सुरक्षा, व्यापार भागीदारी, ऊर्जा प्रकल्प, आरोग्य इत्यादींचा समावेश आहे. मी पंतप्रधान मोदींना मालदीव भेटीसाठी आमंत्रित करू इच्छितो. मालदीवच्या गरजेच्या वेळी भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. मालदीवला दिलेल्या मदतीबद्दल, विशेषत: अलीकडील अर्थसंकल्पीय मदतीबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि सरकारचे आभार मानतो.”
‘इंडिया आऊट’ मोहीम राबवणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांनी भारतात येताच यू-टर्न घेतला. मुइझू म्हणाले की, “आम्ही भारताला एक मौल्यवान मित्र मानतो, त्यामुळे आम्ही भारताची सुरक्षा कमकुवत होईल, असे कुठलेही काम करणार नाही. भारतासोबतचे आमचे संबंध सन्मान आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित आहेत. आम्ही विविध क्षेत्रांमध्ये इतर देशांसोबत सहकार्य वाढवत आहोत, परंतु आमच्या कृतींमुळे आमच्या प्रदेशाची सुरक्षा आणि स्थिरता धोक्यात येणार नाही, याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मालदीवसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विविधता आणणे आणि कोणत्याही एका देशावरील अत्यधिक अवलंबित्व कमी करणे महत्त्वाचे आहे. पण, अशा सहभागामुळे भारताच्या हिताचे नुकसान होणार नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत येण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, “शेजारी आणि मित्रांचा आदर हे मालदीवसाठी भारतीयांचे सकारात्मक योगदान आहे. भारतीय नेहमीच मालदीवमध्ये सकारात्मक योगदान देतात, भारतीय पर्यटकांचे आमच्या देशात स्वागत आहे. मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत आणि मला विश्वास आहे की या भेटीमुळे ते आणखी मजबूत होतील.”