मुंबई : ठाणे, नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात पावसाने हजेरी लावली असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, राज्यात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी १२ वाजता पावसाने हजेरी लावली. तसेच ठाण्यातही दुपारी १२.३० नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. याचबरोबर पश्चिम उपनगरातील पवई, सांताक्रूझ, बोरिवली परिसरात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, राज्यातील काही भागात सोमवार पासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. काही दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.