पनवेल : अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी पाचव्या आरोपीस हरियाणातील भिवानी येथून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या प्रकरणात २० हून अधिक आरोपी फरार आहेत. रविवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी असे आहे. सलमान याच्या हत्येचा कट रचून सलमानच्या हत्येसाठी पाकिस्तानातून शस्त्र खरेदी करण्याचे नियोजन लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील मारेकऱ्यांनी केले होते. पोलिसांच्या हाती मारेकऱ्यांनी आपसात केलेले फोनवरील व्हिडीओचे संभाषणाचा महत्वाचा पुरावा लागल्याने पोलिसांना या हत्येचा कट उधळता आला.
दीपकला शनिवारी हरियाणातील भिवानी येथील तिग्रणा पोलिसांच्या मदतीने पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. दीपक सलमानच्या हत्येच्या कटातील संशयीत आरोपींची राहण्याची तसेच गुन्हा करताना वापरण्यात येणाऱ्या वाहनांची व्यवस्था करणार होता. दीपक हा सातत्याने व्हिडीओ कॅालद्वारे कटातील संशयीत आरोपींतांच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दीपकच्या गुन्ह्यातील सहभागाविषयीची माहिती भिवानी (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षक वरूण सिंघला यांना कळविल्यानंतर भिवानी येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांच्या पथकाने दीपकला ताब्यात घेतले. भिवानी येथील न्यायालयासमोर दीपकला हजर केल्यावर न्यायालयाने ५ जूनपर्यंत दीपकला ट्रांझीट कोठडी रिमांड दिल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी दिली.