पुणे : पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रूपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. मात्र ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले. पाच कोटी जप्त केल्यानंतर पोलीस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि आयकर विभाग अधिकाऱ्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं.
संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे. ही गाडी एका बड्या नेत्याची तथा विद्यमान आमदाराची असल्याची माहिती आहे. पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली, ती गाडी MH 45 AS 2526 या क्रमांकाची असून ती सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.