ठाणे : ठाण्यातून हिट अँड रनची घटना समोर येत आहे. 21 ऑक्टोबर रोजी रात्री एका मर्सिडीज कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन हेगडे असं मृत मुलाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 21 वर्षांचा दर्शन हेगडे सोमवारी रात्री खाण्याचे सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. सामान घेऊन घरी परतत असतानाच नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या मर्सिडीजने धडक दिली. दर्शनला मर्सिडिजने चिरडल्यानंतर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. मात्र, दर्शनचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे. तर, या प्रकरणात अधिक चौकशी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून काहीच अंतरावर हा अपघात घडला आहे. जिथे अपघात घडला तेथील CCTV कॅमेरे बंद पडले होते. एका भरधाव मर्सिडीज गाडीने एका २१ वर्षीय निष्पाप मुलाला चिरडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.