पनवेल : राज्याच्या नगरविकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध महापालिकांना आरोग्यवर्धिनी केंद्रांचे उदिष्ट दिले होते. त्यापैकी पनवेल महापालिकेने १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सूरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. तसेच पालिका क्षेत्रात अजून एक नवीन ‘आपला दवाखाना’ नावडे येथे पालिका सूरू करत असून पाच नवे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पालिका सूरु करणार आहे. पनवेल पालिकेमध्ये नऊ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. सध्या ताप, सर्दी, खोकला व डोकेदुखी यांसारख्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. डेंग्यूमुळे १० महिन्यांत चार बळी गेले असून पालिकेचे आरोग्य विभाग रहिवाशांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी जनजागृती करत आहे. पालिका क्षेत्रामध्ये १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सूरु असतात. मोफत वैद्यकीय औषधे आणि उपचार केंद्रातून मिळते. रात्री दहा वाजेपर्यंत आरोग्यवर्धिनी केंद्र सूरु असणारी पनवेल ही राज्यातील एकमेव पालिका असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
याच आरोग्यवर्धिनी केंद्रातून दिवसाला दोनशेहून अधिक रुग्ण उपचार घेतात. अजूनही तीन आरोग्यवर्धिनी केंद्र पालिका तळोजा वसाहतीसह इतर दोन ठिकाणी हे उपकेंद्र पालिका सूरु करणार आहे. पालिकेचे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ९ ठिकाणी सूरु करण्याचे उद्दीष्ट्य पालिकेसमोर आहे. यापैकी चार उपकेंद्र पालिकेच्या आरोग्य विभाग सूरु करु शकले. अनेक ठिकाणी पालिकेची स्वताची मालमत्ता नसणे, मनुष्यबळ न उपलब्ध होणे अशा समस्यांना पालिकेचे अधिकारी तोंड देत असल्याचे सांगितले जाते. मात्र पालिकेने भाड्याच्या जागेत दवाखाने सूरु करण्याची सूरुवात केली आहे. पालिकेने सिडको मंडळाकडून तळोजातील आरोग्यवर्धिनी सूरु करण्यासाठी काही गाळे घेतल्याचे पालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगीतले. अजून पाच उपकेंद्र लवकरच सूरु करु असे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या पालिका क्षेत्रात एकच आपला दवाखाना खारघर वसाहतीमध्ये सूरु आहे. पालिकेचा दूसरा आपला दवाखाना नावडे गावातील पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कार्यालयात सूरु करण्याच्या हालचाली पालिकेमध्ये सूरु आहेत. पालिकेकडे आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने पालिकेने आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी एमबीबीएस डॉक्टरांच्या थेट मुलाखती घेतल्या जात आहेत. तसेच पालिकेेने वैद्यकीय आरोग्य विभागात ५३ विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीवर नोकर भरतीची प्रक्रीया सूरु केली आहे.