मुंबई : महाराष्ट्रात १ जुलै २०२६ पासून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदत दिली असून, त्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिस आणि Regional Transport Office अर्थात आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार नियमभंग करणाऱ्यांना १,००० रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना HSRP प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. १ जुलैपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, वाहनांची तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर जागीच दंड आकारण्यात येणार आहे. मात्र, ज्या वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक केली आहे, त्यांच्यावर मुदत संपल्यानंतरही कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
HSRP नंबर प्लेट पूर्णपणे टॅम्पर-प्रूफ असून त्यामध्ये क्रोमियम-बेस्ड होलोग्राम आणि युनिक लेझर ब्रँडेड ओळख क्रमांक दिलेला असतो. त्यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेटचा वापर आणि गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. परिवहन विभागाने वाहनधारकांना कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. वाहनधारकांनी अधिकृत पोर्टलवरूनच नोंदणी करून जवळच्या अधिकृत डीलरकडून नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वाहनधारकांनी Parivahan Portal या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

