मुंबई : खाद्यपदार्थ आणि औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता तरुण वर्गात वाढत असलेल्या फिटनेस उत्पादनांसह मद्यातील भेसळीकडे लक्ष केंद्रित केले आहे. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि बनावट औषधांवर कारवाई केल्यानंतर एफडीएने आता ‘न्युट्रास्युटिकल्स’ म्हणजेच आरोग्यविषयक सप्लिमेंट्स तसेच दारूमधील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आगामी कारवाईची माहिती दिली. यावेळी त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाया, न्यायालयाच्या सूचना आणि अन्न सुरक्षेबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.
सध्या तरुणांमध्ये जिम आणि फिटनेसचे प्रमाण वाढल्यामुळे प्रोटिन पावडर, सप्लिमेंट्स आणि विविध न्युट्रास्युटिकल्स उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएकडून अशा उत्पादनांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. उत्पादनांमध्ये वापरले जाणारे घटक, पॅकेटवरील लेबल्स तसेच कंपन्यांकडून करण्यात येणारे दावे यांची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकल्या जाणाऱ्या काही औषधे आणि सप्लिमेंट्सवरही आगामी काळात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. एफडीएच्या प्राथमिक तपासणीत राज्यातील दारूमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. तपासणीनुसार दारूमध्ये ६० टक्क्यांहून अधिक भेसळ आढळून आली असून, यामुळे मद्य सेवन करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या भेसळयुक्त दारूच्या संपूर्ण साखळीवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय एफडीएने घेतला आहे. तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. २००६ आणि २०११ च्या संबंधित कायद्यांची राज्यात कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. निकृष्ट अन्नामुळे केवळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम देशाच्या कार्यक्षमतेवर आणि अर्थव्यवस्थेवरही होतो. गणेशोत्सवादरम्यान एफडीएने सुमारे ५० टन निकृष्ट खाद्यपदार्थ जप्त केले होते. या कारवाईचा कोणत्याही धर्माशी संबंध नसून ती केवळ नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. तसेच अन्नभेसळीबाबत जनजागृती लहानपणापासून व्हावी यासाठी इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात अन्न सुरक्षा आणि भेसळीविरोधी माहितीचा समावेश करण्याची सूचनाही त्यांनी केली.

