वृत्तसंस्था : जागतिक स्तरावरील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींतील चढ-उतारांचा परिणाम आता देशांतर्गत इंधन दरांवरही दिसून येत आहे. देशातील प्रमुख खासगी इंधन विक्रेता नायरा एनर्जीने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ जाहीर केली असून हे नवे दर शनिवारी तात्काळ लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर नायरा पंपांवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १००.७१ रुपये, तर डिझेलचा दर ९१.३१ रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि ऊर्जा क्षेत्रातील अस्थिरतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग आयातीवर अवलंबून असल्यामुळे जागतिक बाजारातील किंमतीतील वाढीचा थेट परिणाम शुद्धीकरण खर्च आणि इंधन विक्रीवर होतो. अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत विक्री किमतींमधील तफावत भरून काढण्यासाठी नायरा एनर्जीला इंधन दर वाढवावे लागले. यापूर्वीही मार्च २०२६ मध्ये कंपनीने पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लिटर वाढ केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर १ जुलै रोजी कंपनीने तितकीच दरकपात केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा जागतिक बाजारातील परिस्थिती बदलल्याने दरवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या खासगी आणि सरकारी कंपन्यांच्या इंधन दरांच्या धोरणांमध्ये स्पष्ट फरक दिसून येत आहे. तसेच स्थानिक कर, मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि इतर शुल्कांमुळे नायरा एनर्जीच्या दरवाढीचा अंतिम परिणाम प्रत्येक राज्यात वेगळा असू शकतो. त्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्षात मोजावी लागणारी किंमत स्थानिक कररचनेनुसार बदलू शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीचा परिणाम केवळ वाहनचालकांपुरता मर्यादित राहणार नाही. डिझेल महागल्याने मालवाहतूक, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. परिणामी विविध वस्तूंच्या वितरण खर्चात वाढ होऊन काही अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इंधन दरवाढीचा अप्रत्यक्ष आर्थिक भार सर्वसामान्य ग्राहकांनाही सहन करावा लागू शकतो.
