पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसळेच्या वडिलांनी आपल्या मुलाला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या 2 कोटी रुपयांच्या पुरस्काराच्या रकमेबद्दल निराशा व्यक्त केली असून, आपला मुलगा यापेक्षा अधिक पात्र आहे अशी भावना व्यक्त केली आहे. कोल्हापुरातील 29 वर्षीय स्वप्नील कुसळे याने ऑगस्टमध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. तेव्हापासून तो चर्चेत आहे.
स्वप्नील कुसळेचे वडील सुरेश कुसळे यांनी म्हटले की, ‘माझ्या मुलाला 5 कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम आणि पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाजवळ एक फ्लॅट मिळावा. हरियाणा सरकार आपल्या (ऑलिम्पिक पदक विजेत्या) प्रत्येक खेळाडूला 5 कोटी रुपये देते. महाराष्ट्र सरकारच्या नवीन धोरणानुसार ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याला 2 कोटी रुपये मिळणार आहेत. गेल्या 72 वर्षांत (1952 मध्ये कुस्तीपटू केडी जाधव यांच्यानंतर) स्वप्नील हा महाराष्ट्राचा दुसरा वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेता असताना राज्य असे मापदंड का ठेवते?” असा प्रश्नही सुरेश कुसळे यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना सुरेश कुसळे यांनी म्हटले की, ‘स्वप्नीलला बक्षीस म्हणून 5 कोटी रुपये आणि बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ फ्लॅट मिळावा, जेणेकरून त्याला सरावासाठी सहज ये-जा करता येईल. तसेच या संकुलातील 50 मीटर रायफल 3 पोझिशन शूटिंग क्षेत्राला स्वप्नीलचे नाव देण्यात यावे.’ अशी मागणीही त्यांनी केली. स्वप्नील हा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे, मात्र सरावासाठी त्याला पुण्यात रहावे लागत असल्याने सुरेश कुसळे यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, हरियाणा सरकार सुवर्णपदक विजेत्याला 6 कोटी रुपये, रौप्य पदक विजेत्याला 4 कोटी रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला 2.5 कोटी रुपये देते हे विशेष. महाराष्ट्र सरकार यासाठी अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि 2 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देते. तसेच इतर राज्येही खेळाडूंनी प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळी बक्षीसे देते.