मुंबई : मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थासह (Drugs) पाणीपुरी विक्रेत्याला मालाड मालवणी येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळून ८ लाख रुपये किमतीचा १०१ ग्रॅम एमडी जप्त केला आहे. कैफ तक्कू खान (२१) असे पाणीपुरी विक्रेत्याचे नाव असून तो वांद्रे पश्चिम लाल मिट्टी परिसरात राहणारा असून त्याच ठिकाणी त्याचा पाणीपुरीचा ठेला आहे.
कैफ हा रविवारी मालाड मालवणी परिसरात मॅफेड्रोन या अंमली पदार्थासह (Drugs) आला होता. मालवणी पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असणाऱ्या बॅगेची तपासणी केली असता पोलिसांना त्याच्याकडे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला. मालवणी पोलिसांनी कैफ याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, तो वांद्रे पश्चिम येथे पाणीपुरीचा ठेला चालवत होता. त्याला देण्यात आलेले पार्सल मालवणी येथे एकाला पोहचविण्यासाठी काही पैशांची लालच देण्यात आली होती.
हे पार्सल घेऊन एका ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले होते, त्या ठिकाणी एक व्यक्ती येऊन ते पार्सल घेऊन जाणार होता. तत्पूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी कैफ याच्या विरुद्ध अंमली पदार्थ (Drugs) प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला पार्सल कोणी दिले होते आणि हे पार्सल घेण्यासाठी कोण येणार होते त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मालवणी पोलिसांनी दिली आहे.