ठाणे : लोकसभा निवडणुकीनंतर सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीतही मतदानाचा पवित्र हक्क बजावून मतदानाची राष्ट्रीय सरासरी गाठूया असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. कल्याण-डोंबिवलीतील मतदारांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत केलेल्या मतदानामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी डोंबिवलीतील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील १४४ – कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या मुख्य कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी तेथील EVM सुरक्षा कक्षासह मतमोजणी ठिकाणाची पाहणी करून केली. यावेळी एकूण व्यवस्थेबाबत दोन्ही अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत निवडणूक यंत्रणेस शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील १४४ – कल्याण ग्रामीण मतदार संघाच्या शुभ्र फलकावर (कॅन्व्हासवर) मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन स्वरुपात आरेखन करत आपल्या स्वाक्षरीची मोहर उमटविली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ – ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, १४४ – कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण, राजू राठोड, संजय भोये, यांच्यासह निवडणूक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.