मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. तसंच समुद्राची थंडगार हवा अनुभवण्यासाठीही दिवसभर शेकडो लोक याठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे हा परिसर कायम वर्दळीचा असतो. गेटवे वरून बोटीत बसायचं म्हटलं तर फार वाट पाहावी लागते. शिवाय बोटीत बसण्यासाठी समुद्रात पायऱ्या उतराव्या लागत असल्यानं अनेकजण घाबतात. म्हणूनच आता नवी जेट्टी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईहून जेएनपीटी, मांडवा, एलिफंटाला बोटीनं जायचं असेल तर आता गेटवे ऑफ इंडियाला नाही तर रेडिओ क्लबला जावं लागणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून इथं नव्या जेट्टीचं बांधकाम करण्यात येणार आहे. तर, गेटवे ऑफ इंडियामध्ये आता मनसोक्त पर्यटन करता येईल. ही वास्तू फक्त पर्यटकांसाठीच असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या अडीच वर्षात नव्या जेट्टीचं बांधकाम केलं जाणार आहे. त्यासाठीच्या परवानग्या मिळाल्या असून कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. तब्बल 229 कोटी 28 लाख रुपये खर्च करून महाराष्ट्र सागरी मंडळ नवी जेट्टी उभारणार आहे.
25 हजार 148 चौ. किमी. एवढ्या क्षेत्रफळात नवी जेट्टी असेल. इथं एकाच वेळी 20 बोटी उभी करण्याची व्यवस्था असेल. टर्मिनल प्लॅटफॉर्मची रुंदी 80 बाय 80 मीटर एवढी, तर, 114 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद जागेत जेट्टी असेल. संरक्षण भिंतीपासून जेट्टीची पूर्ण लांबी 650 मीटर असेल. याठिकाणी सुरक्षा तपासणी क्षेत्र, वेटिंग एरिया, टॉयलेट, पाणपोई, अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही, इत्यादी व्यवस्था असणार आहे. सागरमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पाचं बांधकाम केलं जाणार असून यात क्रेंद आणि राज्य शासनाची भागीदारी 50-50 टक्के असेल, असं कळतं आहे.