पनवेल : पोलिस दलात कर्तव्य बजावत असताना अनेक कर्मचाऱ्य़ांचा अकाली मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांना अधिकवेळ डुटी बजवावी लागत असल्याने त्यांच्यावर शारीरिक तसेच मानसिक ताण वाढत आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ संतुलित राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने जास्त वेळ ड्युटी करावी लागते. निवडणूक काळात कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागतो. याचा गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्य़ाचं दिसून येत आहे.
महाड तालुक्यातील पोलिस हवालदाराच्या अकाली मृत्यूने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. रायगडमधील महाड पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सागर गायकवाड असं या पोलिस कर्माचाऱ्याचं नावं होतं. ऑन ड्युटी कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड पोलिस ठाण्यात वॉरेंट बनविण्याचं काम करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली, प्रसंगावधान राखत इतर सहकाऱ्यांनी त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
सागर गायकवाड हे याआधी रायगड जिल्हा अधीक्षक कार्यालय वाहतूक पोलीस महाड येथे कार्यरत होते. राज्यातील अनेक ठिकाणी त्यांनी पोलिस खात्यात नोकरी केली. गायकवाड यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाड पोलिस सुरक्षा विभागावर शोककळा पसरली आहे. गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी महिला पोलीस हवालदार नीलिमा गायकवाड, आणि दोन मुलं असं त्याचं कुटुंब आहे. यकवाड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून रायगड जिल्हा पोलीस दलामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपला काम करत होते महाड ग्रामीण रुग्णालय येथे शिवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलं असून महाड शहर पोलीस ठाणे येथे सदरचा मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.
सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असणाऱ्य़ा पोलिसांना सणासुदीच्या काळात देखील अतिरिक्त तास सेवा करावी लागते. पोलिसांना असलेल्या सुविधा देखील कमी आहेत. सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या पोलिस दलाकडे गृह विभागाने सर्वाधिक लक्ष देणं आवश्यक आहे, अशी मागणी पोलिसदलाच्य़ा वतीने करण्यात आली आहे.