मुंबई : मुंबईमधील दुकाने व आस्थापनांवर मराठी, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक असूनही ते लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या दुकाने व आस्थापनांवर १ मे पासून मालमत्ता करा इतक्या रकमेचा दंड आकारण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्तांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर गेल्या १५ दिवसांमध्ये ६२५ दुकाने व आस्थापनांनी मराठी, देवनागरी लिपितील नामफलक लावून नियमाची पूर्तता केल्याचे निदर्शनास आले आहे. न्यायालयीन व महानगरपालिका सुनावणी प्रकरणांमध्ये संबंधितांकडून सुमारे ५० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये तपासणी करण्यात आलेल्या १,२८१ पैकी १,२३३ आस्थापने व दुकानांवर मराठी, देवनागरी लिपीतील नामफलक योग्यरित्या लावण्यात आल्याचे आढळून आले. दरम्यान, ज्या आस्थापना व दुकानांनी मराठी नामफलक लावलेले नाहीत, अशी दुकाने व आस्थापनांची माहिती नागरिकांनी महानगरपालिकेला द्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापनांविषयक बाबी, अनुज्ञापन पद्धती आदी बाबींचा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ८ एप्रिल रोजी आढावा घेतला होता. दरम्यान, मराठी भाषेत नामफलक नसलेल्या दुकाने व आस्थापनांना १ मे पासून त्यांच्या मालमत्ता करा इतका दंड ठोठावण्याचे आदेश गगराणी यांनी दिले होते.
त्यानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. मागील १५ दिवसांत महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या पथकांनी मिळून सुमारे १,२८१ आस्थापनांना भेटी दिल्या. त्यापैकी, १,२३३ आस्थापनांनी अधिनियमातील तरतुदींनुसार नामफलक लावल्याचे आढळले. तर, ज्या ४८ दुकाने व आस्थापनांवर निकषानुसार किंवा योग्यरित्या फलक आढळले नाहीत, त्यांना निरीक्षण अहवाल देण्यात आले आहेत. न्यायालयात आतापर्यंत एकूण ७४२ प्रकरणांची सुनावणी होवून न्यायालयाने एकूण ५७ लाख ०४ हजार ६०० रुपये दंड संबंधित दुकाने व आस्थापना व्यावसायिकांना ठोठावला आहे. त्याचप्रमाणे, महानगरपालिका प्रशासनाकडे सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणांपैकी ४०३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यातून एकूण ३८ लाख २८ हजार रुपये दंड संबंधित दुकाने व आस्थापना व्यावसायिकांना ठोठावण्यात आला आहे. तसेच, मागील १५ दिवसांत न्यायालयात ५६५ प्रकरणांवर सुनावणी होवून ४३ लाख १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडे ६० प्रकरणांमध्ये सुनावणी होवून ६ लाख ४२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिकेने तैनात केलेली पथके ठिकठिकाणी जावून दुकाने व आस्थापनांच्या नामफलकांची तपासणी करीत आहेत. मराठी नामफलक नसलेली दुकाने व आस्थापना निदर्शनास आल्यास नागरिकांच्या त्यांची माहिती महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांना द्यावी, जेणेकरून संबंधितांवर कार्यवाही करता येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.