उल्हासनगर : मागच्या आठवड्यात महानगरपालिका आयुक्त अजीज शेख आणि ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर आली आहेत. या कारवाईत ११ वाहनांची टोइंग करण्यात आली असून मालकांकडून १७ हजार रुपयांचा दंड वसूलण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली २४ एप्रिल रोजी महानगरपालिका क्षेत्रातील वाहतुक समस्येबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त विजय पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे, सुधाकर खोत, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,मुख्यालय उपायुक्त किशोर गवस आदी उपस्थित होते.बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यांवर बेवारस पडून आहेत.
या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असून रस्त्यांची साफसफाई करताना अडथळा होत असल्याने अशा बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालिकेचे नोडल अधिकारी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक व स्थानिक पोलीस यांच्या उपस्थितीत कॅम्प नं. १ ते ३ मधील मुख्य रस्त्यांवरील ११ बेवारस वाहने टोइंग करण्यात आली तसेच वाहन मालकांकडून १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर बेवारस वाहने आढळून आल्यास संबंधीतांना ४८ तासाची नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यावरही वाहन न उचलल्यास महानगरपालिका ते वाहन जप्त करणार आहे. त्यानंतर आरटीओ मार्फत वाहनाचे मूल्यांकन करून त्याचा लिलाव करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.