मुंबई : पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत. पावसाळ्यापूर्वी म्हणजे ५ जून पर्यंत नाल्यातील गाळ काढण्याची कामे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे स्पष्ट आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. पावसाळा जवळ आला असून यंदाच्या पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सर्व परिमंडळांचे उप आयुक्त, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
परिमंडळाचे उप आयुक्त, सहायक आयुक्त यांनी दररोज सकाळ, सायंकाळी विभागात प्रत्यक्ष कार्यस्थळी भेटी देऊन पाहणी करावी. पाणी साचण्याच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून पाण्याचा जलद गतीने निचरा होण्याकामी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात जेणेकरून मुंबईकर नागरिकांना पावसाळयात निर्धोक राहता येईल, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी गगराणी म्हणाले की, नाल्यालगतच्या रहिवाशांकडून नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी असल्या तरी तरीदेखील तरंगत्या कच-याची (फ्लोटींग मटेरियल) योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी. नाले तुंबता कामा नये याची दक्षता घेतानाच तरंगत्या कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. अरूंद नाल्याच्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ चा वापर करावा. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांचा सहयोग घ्यावा, असेही गगराणी यांनी नमूद केले. पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे देखील समाविष्ट आहेत. रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबई महानगरात पाणी साचू नये, त्याचा जलद गतीने निचरा व्हावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, असे देखील आदेश आयुक्तांनी दिले.