मुंबई : वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी डबेवाल्यांना परवडणाऱ्या किमतीत घरं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय, योगेश सागर, तमिळ सेल्वन, नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गेल्या १३५ वर्षांपासून मुंबईचे डबेवाले संगणक किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर अचूक आणि वक्तशीर सेवेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी आपली सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. ही जगातील अद्वितीय परंपरा आहे.” त्यांनी ‘डबेवाला भवन’चं आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात रूपांतर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
या केंद्रात व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून ते डबे वितरणापर्यंतच्या डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येतो, याचं त्यांनी कौतुक केलं. डबेवाल्यांची निर्व्यसनी आणि वारकरी परंपरेवर आधारित सेवा जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगत त्यांनी या केंद्रासाठी पुढील काळात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे त्रिपाठी आणि नफा न घेता उत्कृष्ट बांधकामाची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह यांच्या संपूर्ण टीमचं विशेष कौतुक केलं. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती त्यांनी दिली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी डबेवाल्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितलं की, “विठ्ठलाच्या नावानं लोकांच्या पोटापाण्याची सेवा करणाऱ्या डबेवाल्यांचं हे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र मुंबईकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. हे केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल आणि व्यवस्थापनाचे धडे देणारे ठिकाण म्हणून मुंबईची ओळख अधिक दृढ करेल.” त्यांनी गिरणी कामगार, बीडीडी चाळ, धारावी, कामाठीपुरा येथील रहिवासी तसेच कोळी बांधव आणि पदपथावरील विक्रेते यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राबवलेल्या गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांचेही कौतुक केलं.

