मुंबई : संपूर्ण राज्यात सध्या अस्थिर हवामान पहायला मिळत आहे. दिवसभराच्या उकाड्यानंतर अनेक शहरांमध्ये सायंकाळी पाऊस हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आज राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. आज हवामान विभागाने मुंबई-कोकणासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांमधील काही भागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेस नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आलेले आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडसह विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यमतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व भागातील नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केरळमधील दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा..
हवामान खात्याने आज संपूर्ण केरळ राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मात्र आज तिरुअनंतपुरम आणि इडुक्कीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.