पुणे : पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या स्टेशनच्या तळमजल्यावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास फोम मटेरियलला आग लागली होती, त्यानंतर अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठ अनर्थ टळला आहे. मंडई मेट्रो स्टेशनला लागलेल्या आगीच्या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. मात्र वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. तसेच या घटनेनंतर मेट्रोचा प्रवास सुरळीत सुरु राहणार असल्याचे सांगितले.
मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट..
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. या आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्री. श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.’
पुणे मेट्रोच्या या टप्प्याचे एका महिन्यापूर्वी उद्घाटन झाले होते. मात्र आता महिनाभरातच ही दुर्घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेकांनी मेट्रो प्रशासनावर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी मेट्रोचे काम पू्र्ण नसताना उद्घाटनाची घाई का केली असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, या आगीच्या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाण्याचे कारण नाही अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. तसेच पुणे मेट्रोबाबत अफवा न पसरवण्याचेही आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.