डोंबिवली : पहिल्या ९९ उमेदवारांच्या यादीत भाजपाने डोंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे भाजपासह महायुतीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीच्या शिवसेना मध्यवर्ती शाखेत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन केले. भाजपाकडून सलग चौथ्यांदा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चव्हाण यांनी सर्वप्रथम इंदिरा गांधी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मंदिर, घर, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाप्रमाणेच पवित्र स्थान मानणाऱ्या शिवसेना शाखेत जाताना नेहमी प्रमाणेच रविंद्र चव्हाण यांनी त्यांची पादत्राणे शाखेबाहेर काढून त्यानंतरच शाखेत गेले. त्यांच्या या नम्रता आणि शिस्तिची चर्चा शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांत रंगली होती, हे विशेष असल्याचे मत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केले.
पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखानपाडा, चिंचोळ्याचा पाड्यात जाऊन रविंद्र चव्हाण यांनी तेथील भूमिपुत्र ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी विकास म्हात्रे, जनार्दन म्हात्रे यांनी पुढाकार घेत भूमिपुत्रांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्याला परिसरातील शेकडो ग्रामस्थांसह भूमिपुत्र उपस्थित होते. रिंगरोड मधील बधितांना त्यांचा पूर्ण मोबदला मिळवून देणार असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी जाहीर करतानाच पाश्चिमेला आगरी भवन उभारणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली.यावेळी के. एस. ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह दयानंद म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, भरत वझे, विश्वास भोईर, दशरथ म्हात्रे, रमेश पदू म्हात्रे, माणिक म्हात्रे, मंगेश पाटील, बाळा पाटील, विनोद म्हात्रे, किशोर भोईर, नितीन म्हात्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते. तर मराठा मंदिरमध्ये गणेश सरवणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चव्हाण यांना पाठिंबा असल्याचे सांगितले. वामन म्हात्रे फाऊंडेशनतर्फे २० वर्षे सुरू असलेल्या भाऊबीज सोहळ्याला रविंद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, माजी नगरसेविका कविता म्हात्रे, ॲड. गणेश पाटील यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.