डोंबिवली : डोंबिवली ग्रामीण भागात राहत असलेल्या एका ३२ विवाहितेवर तिच्या पतीसह आणि दीराने आळीपाळीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. दोन्ही भावांचा त्रास वाढू लागल्याने त्रस्त पीडितेने कल्याणच्या महिला तक्रार निवारण केंद्रात याप्रकरणी तक्रार केली. या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी दोन्ही भावांसह या मुलांची आई, भावजय यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, पीडित विवाहितेचे गेल्या वर्षी ३७ वर्षाच्या तरूणा बरोबर लग्न झाले होते. पीडिता ही कल्याणमध्ये आपल्या कुटुंबीसमवेत राहत होती. ती मूळ उत्तर प्रदेशातील आहे. आरोपी कुटुंब हेही उत्तरप्रदेशातील आहे. ते डोंबिवलीत राहते. विवाहानंतर पीडित तरूणी डोंबिवलीत सासरी आली. लग्नानंतर काही दिवसांनी पीडितेचा पती पीडित महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करू लागला. पीडिता त्याला विरोध करत होती, पण पती तिचे म्हणणे ऐकत नव्हता.
पतीचा भाऊ (दिर) हाही पीडिते सोबत लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी करू लागला. सुरूवातीला तिने त्यास प्रतिकार केला. पण दिरानेही नंतर पीडितेबरोबर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. तिच्याशी तो अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करू लागला. दोन्ही भाऊ आपला लैंगिक अत्याचार करून छळ करत आहेत. हा विषय बाहेर कोणाला सांगू शकत नाही या विचाराने पीडिता चिंतातूर होती. गेल्या वर्षी जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. या दोन्ही भावांची आई आणि भावजय दोघीही पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होत्या. सासरच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या सततच्या छळामुळे पीडितेने धाडस करून कल्याणच्या महिला तक्रार निवारण केंद्रात एक अर्ज दिला. पोलिसांनी या अर्जाची दखल घेऊन हा अर्ज मानपाडा पोलिसांकडे चौकशीसाठी पाठविला. पोलिसांनी या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून पीडितेच्या पतीसह त्याचा भाऊ, आई आणि भावजय विरूध्द गुन्हा दाखल केला.