कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचोरे येथील न्यू गोविंदवाडी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतीत दुकान का चालवितो. असे प्रश्न करून दोन जणांनी एका अपंगासह त्याच्या दोन बहिणींना याच इमारतीमधील दोन जणांनी बेदम मारहाण केली. याठिकाणाहून निघून गेला नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा आरोपींनी दिला आहे. निजाम मदार शेख (४१) असे अपंगाचे नाव आहे. ते कचोरे येथील न्यू गोविंदवाडी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या घरात राहतात. ते येथे कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी एक दुकान चालवितात. सिकंदर नूर मोहम्द बगाड (३४), इक्बाल नूर मोहम्मद बगाड (३८) अशी आरोपींची नावे आहेत. ते याच वस्तीत राहतात. पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात तक्रारदार निजाम शेख कचोरे येथील न्यू गोविंदवाडी वसाहतीमधील आपल्या दुकानात बसले होते. संध्याकाळच्या वेळेत आरोपी सिकंदर बगाड, इक्बाल बगाड तेथे आले. त्यांनी मोठ्या ओरडा करत शिवागीळ करत निजाम हे अपंग आहेत.
हे माहिती असूनही त्यांना त्यांच्या दुकानातून बाहेर ओढले. त्यांना बेदम मारहाण केली. अपंग असल्याने निजाम स्वताचा बचाव करू शकले नाहीत. ते बचावासाठी ओरडत असताना निजाम यांच्या दोन बहिणी तेथे येऊन आपल्या अपंग भावाला मारहाणीपासून वाचविण्याचा प्रयत्न करू लागल्या. यावेळी आरोपींनी या दोन्ही बहिणींना शिवीगाळ करत मारहाण केली. तू येथले दुकान बंद कर नाहीतर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील, असा इशारा देत आरोपी तेथून निघून गेली. या मारहाणीमुळे निजाम रुग्णालयात दाखल झाले. उपचार घेतल्यानंतर ते टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले. पोलिसांनी अपंग संरक्षण कायद्याने गु्न्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक जे. बी. शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.