नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. चंद्रचूड यांनी आमदारांना अपात्र ठरविण्याच्या प्रकरणांवर योग्य व वेळेत निर्णय घेतला नाही, ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, असा आरोप राऊत यांनी केला होता.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माजी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, आमच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाची घटनात्मक प्रकरणं सुरू होती. नऊ न्यायमूर्तींचे खंडपीठ, सात न्यायमूर्तींचे खंडपीठ आणि पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे निर्णय आम्ही दिले. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्याची सुनावणी करावी, हे कोणताही एक पक्ष किंवा व्यक्ती ठरवू शकतो का? सॉरी हा निर्णय फक्त सरन्यायाधीशच घेऊ शकतात.
आरोप फेटाळत चंद्रचूड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाकडे मर्यादित साधने आणि न्यायाधीश देखील मर्यादित आहेत आणि म्हणूनच घटनात्मक प्रकरणे हाताळताना समतोल राखणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयात गेल्या २० वर्षांपासून अनेक महत्त्वाची प्रकरणे प्रतीक्षेत आहेत. ती जुनी प्रकरणे ऐकण्यापेक्षा अलीकडच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करावे का? सर्वोच्च न्यायालयाचे प्राधान्य समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या घटनात्मक मुद्द्यांवर आहे.
संजय राऊत यांच्या आरोपावर बोलताना डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, काही राजकारण्यांना वाटतं की आम्ही त्यांचा अजेंडा पाळला तरच आम्ही स्वतंत्र आहोत. राजकीय अजेंड्यांनुसार न्यायालय चालेल अशी अपेक्षा करणं चुकीचे आहे.