मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी मंत्रालय मुंबई शेजारील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शांततेत आंदोलन करण्याचे दिव्यांग बांधवांनी प्रयत्न केला. परंतु पोलीस प्रशासनाने दीड हजार दिव्यांगांना पकडून आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी सोडून दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात शेजारील आकाशवाणी आमदार निवास इमारतीवरील छतावर चढून कडक उन्हात लक्षवेधी आंदोलन केले. दरम्यान, सरकार दिव्यांगांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या गेट समोर बसून मुसळधार पावसातही आंदोलन सुरू केले होते.
यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अर्धा तास पावसात दिव्यांगांसोबत बसून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर सरकारच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलन स्थळी येऊन सर्व मागण्या मंजूर करून सरकारसोबत चार दिवसात 30 तारखेला बच्चू कडू यांच्यासोबत बैठक घेऊन सर्व मंजूर मागण्यांचे शासन पत्र काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दिव्यांगांचे प्रमुख मागण्या :
1) दिव्यांगांना दरमहा 6000 रुपये पेन्शन देण्यात यावी.
2) दिव्यांगाना स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देण्यात यावे.
3) भूमीन बेघर दिव्यांगाना घरकुल देण्यात यावे.
4) सरकारी नोकरीतील दिव्यांगांचा नोकरीतील अनुशेष भरण्यात यावा.
5) दिव्यांगांच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मैदान करण्यात यावे.
६) दिव्यांगाना मोफत औषध उपचार सुविधा पुरविण्यात यावी.
७) प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन निर्मिती करावी
८) दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी जागा व अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे.
दरम्यान, या आंदोलनात धर्मेंद्र सातव, रामदास खोत, शिवाजी गाडे, सुरेश मोकल, सुरेखाताई ढवळे, संजीवनी बारगुळे, सुप्रिया लोखंडे, अनिता कदम, काजल नाईक,सुरेखा सूर्यवंशी, रामदास कोळी, सिद्धाराम माळी, श्री मुंडे,रघुनाथ तोंडे, शरद जाधव, ज्ञानदेव म्हेत्रे, बाळासाहेब काळभोर, हरीश सूर्यवंशीसह महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.