नवी दिल्ली प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोग आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. दोन दिवस महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बैठकांचा ते आढावा घेऊन निवडणूक संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे काल रात्री 8 वाजता मुंबई विमानतळावर पोहचले होते.
आज शुक्रवारी आयोगाचे अधिकारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत. दुपारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक होणार असून दुपारी तीन वाजता गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतील. तसेच त्यांना काही सूचना दिल्या जातील. तर शनिवारी इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीत उत्साह पाहायला मिळत आहे. तर मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही असणार आहे.