मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महत्त्वाचे पाऊल उचलले असून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांच्या परिसरात जंक फूडविरोधात कठोर मोहीम सुरू करण्यात आली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार शाळांपासून ५० मीटरच्या परिसरात उच्च चरबी (High Fat), जास्त साखर (High Sugar) आणि अधिक मीठ (High Salt) असलेल्या पदार्थांची विक्री रोखण्यावर भर देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांतील कँटीनचा मेन्यू बदलण्यात आला असून, विद्यार्थ्यांना आता अधिक पौष्टिक आणि संतुलित आहार उपलब्ध करून दिला जात आहे. यापूर्वी अनेक शाळांच्या कँटीनमध्ये वडा-पाव, समोसा, पॅटीस, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर जंक फूड सहज उपलब्ध होत होते. मात्र आता त्याऐवजी इडली, डोसा, पोहे, उपमा, शिरा, ताक आणि इतर आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चव आणि पोषण यांचा समतोल साधणारा आहार मिळणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. एफडीएने शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड, कार्बोनेटेड शीतपेये तसेच आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी कठोर सूचना दिल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारची विक्री आढळल्यास तातडीने प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने २०२० मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. मात्र अनेक ठिकाणी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. आता एफडीएने राज्यभर या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून, त्याचे परिणाम मुंबईतील शाळांमध्ये स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्येही हे नियम प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. आठवडाभरात सर्व शाळांमध्ये आवश्यक बदल पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय मुख्याध्यापक, प्राचार्य, शाळा व्यवस्थापन समित्या आणि अन्न समित्यांच्या सदस्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराविषयी जागरूकता निर्माण करणे, पालकांना योग्य माहिती देणे आणि शाळांमधील कँटीन चालकांना मार्गदर्शन करणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे. मुंबई शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. सरकारी आणि खासगी शाळांमधील सुमारे ९०० प्रतिनिधी तसेच मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या ५० संस्थांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व, जंक फूडचे दुष्परिणाम आणि शाळांमधील अन्न सुरक्षा मानके याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शहरातील अनेक शाळा चालवणाऱ्या एबीई संस्थेचे फ्रान्सिस स्वामी यांनी सांगितले की, एफडीएच्या निर्देशानुसार शाळांमधून वडा-पाव, समोसा आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. त्याऐवजी इडली, डोसा, पोहे, उपमा, शिरा यांसारखे पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. तसेच कोल्ड ड्रिंक्सच्या जागी ताक आणि इतर आरोग्यदायी पेयांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान वयात सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे शालेय जीवनापासूनच संतुलित आहाराची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पौष्टिक अन्न महत्त्वाची भूमिका बजावते. एफडीएच्या या निर्णयामुळे शाळांच्या कँटीनमध्ये आरोग्यदायी अन्नाला प्राधान्य मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये योग्य आहाराच्या सवयी रुजण्यास मदत होणार आहे. राज्यभरात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
