मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या बससाठी बस थांब्यावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागू लागल्या आहेत. खच्चून भरलेल्या बसगाड्या आणि बस थांब्यांवरील प्रवाशांच्या रांगा हे बेस्टच्या ढिसाळ कारभाराचेच लक्षण आहे. गेल्या काही महिन्यांपासून थांब्यावर बस येण्याच्या कालावधीतही दुपटीने वाढ झाली आहे. पूर्वी ३० मिनिटांवर असलेला हा कालावधी आता तब्बल एक तासावर पोहोचला आहे. एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. बेस्ट उपक्रमाने बस ताफा वाढवण्याचा संकल्प सोडला असला तरी हे उद्दीष्ट्य साध्य होऊ शकलेले नाही. जुन्या गाड्या भंगारात काढाव्या लागल्यामुळे गाड्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बस फेऱ्यांची संख्या घटली आहे. बसची वाट पाहून कंटाळलेले प्रवासी रिक्षा, टॅक्सीकडे वळत आहेत. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या आणखी रोडावत आहे. बसची संख्या कमी झाल्यामुळे, तसेच नवीन वातानुकूलित गाड्या ताफ्यात समाविष्ट होण्यास विलंब झाल्यामुळे प्रवासी बेस्टच्या बसकडे पाठ फिरवत आहेत.
बस सेवेत सुधारणा करण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळे बेस्टच्या बस थांब्यांवर प्रवाशांच्या वाढू लागल्या आहेत. बऱ्याच वेळाने येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात भर पडते आहे. या सगळ्याला बेस्ट प्रशासनाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते आणि बेस्ट समितीचे सदस्य रवी राजा यांनी केला आहे. महापालिकेने बेस्ट प्रशासनाला भांडवली खर्चासाठी गेल्या काही वर्षांपासून अनुदान दिले आहे. तसेच त्यानंतरही वेगळी आर्थिक मदत दिली जाते. मात्र तरीही बेस्टच्या ताफ्यात बसगाड्या का येत नाहीत, असा सवाल मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. बेस्टच्या गाड्यांच्या ताफ्यातील बसगाड्या दिवसेंदिवस कमी होत असून त्यातुलनेत नवीन गाड्या ताफ्यात दाखल होत नाहीत. प्रवाशांची बसगाड्यांची मागणी वाढत असताना त्यातुलनेत गाड्या उपलब्ध नसल्यामुळे खासगी गाड्यांच्या खरेदीत वाढ होऊ लागली आहे, असे मत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले आहे. मुंबईची व्याप्ती पाहता बेस्टकडे गाड्यांचा ताफा कमी आहे, तर जुन्या गाड्या भंगारात जातात. त्यातच कार्यादेश दिल्यानंतरही नवीन गाड्या येण्यास वेळ लागत आहे. सध्या साडेतीन हजार गाड्यांचा ताफा असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा ताफा दहा हजारापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. मात्र येत्या एक-दीड वर्षात गाड्यांचा ताफा पाच हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट बेस्ट प्रशासनाने ठेवले आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बस ताफा किती?
स्वमालकीच्या – १०९९
कंत्राटी बस – १९०९
एकूण ताफा – ३००८