पिंपरी : कमी किमतीत जमीन घेऊन एक ते दीड वर्षात दुप्पट भावाने विक्री करण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका व्यावसायिकाची एक कोटी २९ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०२३ कालावधीत घडली. विशाल अशोक चुगेरा (रा. वानवडी), शिवम बनवारीदास महंत (रा. वडगाव शेरी), मनोज सरसनाथ राय (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गिरीश आव्हाड (वय ४७, रा. बाणेर रस्ता, औंध) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी आव्हाड आणि मनोज राय यांची १० ते १२ वर्षांपासून ओळख आहे. जुलै २०१९ मध्ये मनोजने शिवम, विशालची ओळख करून दिली. त्या वेळी त्यांनी हवेलीतील शिरसवाडी परिसरात असलेल्या प्लॉटिंगची विक्री सुरू असल्याचे सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास दीड वर्षात दुप्पट भावाने जागेची विक्री करून देण्याचे आमिष त्यांनी दाखविले. त्यामुळे आव्हाड यांनी २०१९ मध्ये विशालच्या बँक खात्यात एक कोटी १० लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा केले. शिवमला कमिशनपोटी १७ लाख, मनोजला अडीच लाख रुपये दिले. मात्र, काही दिवसांनी आव्हाड यांनी तिघांना संपर्क केला असता, त्यांनी जमीन नावावर करून देण्यास टाळाटाळ केली. प्लॉट खरेदीच्या नावाखाली तिन्ही आरोपींनी आव्हाड यांच्याकडून घेतलेले एक कोटी आणि कमिशन असे मिळून एक कोटी २९ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.