ठाणे : नववर्ष स्वागतानिमित्ताने अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांचा सुमारे साडे पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात असणार आहे. तसेच गैरकृत्य टाळण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पोलीस नजर ठेवणार आहे. मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी पूर्वी २५ श्वास विश्लेषक यंत्र उपलब्ध होते. यामध्ये आता आणखी १८ यंत्रांची वाढ झाली आहे. तसेच ‘ऑल आऊट’ मोहीम सुरूच राहणार आहे अशी माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी यांनी दिली.
नववर्ष स्वागतानिमित्ताने रविवार असल्याने रात्रीच्या वेळेत नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे. नववर्ष स्वागत शांततेमध्ये पार पडावे. तसेच शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस सज्ज झाले आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात साडे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. यामध्ये सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी कर्मचारी, गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, वाहतुक पोलीस, शीघ्र कृती दलाच्या अधिकाऱ्यांचा सामावेश असणार आहे. आयुक्त अशुतोष डुंबरे हे देखील बंदोबस्ताची पाहणी करणार आहेत. काही ठिकाणी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर या दिवशीच्या रात्री शहरातील मुख्य चौक, रस्ते, तलाव परिसर परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्ती पथके आणि नाकाबंदी केली जाणार आहे. विनयभंग, मोबाईल खेचून नेणे इत्यादी प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथक, छेडछाड विरोधी पथक, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
ठाणे वाहतुक पोलिसांकडून शहरातील सर्व प्रवेशद्वारावर विशेष नाकाबंदी केली जाणार आहे. येथे श्वास विश्लेषक यंत्रांद्वारे मद्यपी वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. ठाणे वाहतुक पोलिसांकडे २५ श्वास विश्लेषक यंत्र होते. यामध्ये १८ नव्या यंत्रांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता यंत्रांची संख्या ४३ इतकी झाली आहे. मद्यपी वाहन चालकांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले. शहरात ऑल आऊट या मोहिमेद्वार पोलिसांकडून हद्दपार, पाहिजे असलेल्या आरोपींविरोधात कारवाई केली जात आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्पादन शुल्क विभागानेही शहरातील बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाई केली आहे. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला या कारवायांमध्ये वाढ होणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले.