ठाणे : धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. २२ नंबर सर्कल, किसननगर या भागातील यु.आर.सी. क्र.१ व २ येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी नागरी पुनरुत्थान (क्लस्टर) पुनर्विकास योजनेतील नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर येथील नेचरपार्क व इतर विविध विकास कामांचा ई-शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक श्री. मल्लिकार्जुन, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे आणि माजी नगरसेवक, नगरसेविका, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, क्लस्टरसाठी अनेक संघर्ष करावे लागले. साईराज बिल्डिंगची दुर्घटना अजूनही लक्षात आहे. त्यातील 18 जण मृत्युमुखी पडले, ही घटना माझ्या मनाला चटका लावून गेली. धोकादायक इमारती सर्वांनाच काळजीत टाकणाऱ्या असतात. या पार्श्वभूमीवर ही योजना राबविण्याचा संकल्प केला. काही इमारती अनधिकृत जरी असल्या तरी त्यातील जिवंत माणसे, त्यांचा जीव महत्त्वाचा, ही माणुसकीची भावना महत्त्वाची, या भावनेतूनच क्लस्टर योजनेचा जन्म झाला. क्लस्टर योजनेत काही त्रुटी होत्या. मात्र देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्रुटी दूर करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. महापालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास आणावी. ते म्हणाले, या योजनेतील पुढील टप्प्यातील कामांकरिता आपल्याला वेगवेगळे भूखंड मिळत आहेत. क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात साडेदहा हजार घरांचे काम पूर्णत्वास जाणार आहे, पुढील काम हे दोन टप्प्यातच पूर्ण करण्याचे मी निर्देश दिले आहेत. क्लस्टर योजनेसाठी पूर्वी काम केलेल्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पंधराशे हेक्टर भूखंडावर होणारा हा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला इतका मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण समाजासाठी जगणे, ही होती. हीच शिकवण घेऊन मी आता जगतोय. मुख्यमंत्रीपदाचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवन बदलण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय.
डीप क्लीन ड्राईव्हविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हे अभियान यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात हे अभियान राबविले जाणार आहे आणि हे केवळ एक-दोन दिवसासाठी नव्हे तर नियमितपणे राबविले जाणार आहे. सर्वांनाच नियमित स्वच्छतेची सवय व्हायला हवी. केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत, याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, “आनंदवन” ही संकल्पना मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त अशी संकल्पना आहे. या योजनेंतर्गत ठाण्यातील पहिल्या टप्प्यात २७ किलोमीटर आणि ५०० मीटर रुंदीचा श्रीनगर ते गायमुख या भागात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्षारोपण, ग्रीन पॅच, ऑक्सिजन पार्क, अर्बन फॉरेस्ट हे उपक्रम राबविले जाणार आहेत. शासनाकडून राज्यात बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रकल्पात बांधकाम करणाऱ्या शिर्के कन्ट्रक्शन कंपनीचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की, लोकांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची घरे बांधून द्यावीत. नुसत्या इमारती उभ्या न करता नियोजित शहर निर्माण करायचे आहे. येथील लोकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा मिळायला हव्यात. क्लस्टर हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध असून आनंदवन, क्लस्टर आणि डीप क्लीन ड्राईव्ह या अभियानाचा परिणाम निश्चितच येत्या काळात सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने दिसून येईल. भविष्यात ठाण्यातील व राज्यातील इतर शहरांचाही क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून विकास केला जाईल. सर्वांच्या सहकार्याने ठाणे शहर, ठाणे जिल्हा अन् राज्याचाही सर्वांगीण विकास करावयाचा आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविक करताना क्लस्टर पुनर्विकास योजनेबद्दलची माहिती सांगितली. तसेच “आनंदवन” Forest in the City आणि क्लस्टर समूह विकास योजना” याबाबतची चित्रफीत दाखविण्यात आली. शेवटी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.