पुणे : पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्त उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दिलेल्या आदेशाला डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ठाकूर यांच्या विरोधात निकाल दिला आहे. या प्रकरणी तत्कालीन अधीक्षक डॉ. विनायक काळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दावा दाखल केला होता. डॉ. काळे यांची अचानक बदली करण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून पुन्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. काळे हे जे. जे. रुग्णालयाच्या उपअधिष्ठाता पदावरून पदोन्नतीने दीड वर्षांपूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रूजू झाले होते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची जानेवारीमध्ये अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी करण्यात आली होती, तर अधिष्ठातापद डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यावेळी डॉ. ठाकूर हे सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. या निर्णयाच्या विरोधात काळे यांनी मॅटकडे धाव घेतली होती. या प्रकरणी मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे या निर्णयाला डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर उच्च न्यायालयाने डॉ. ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्ती रद्द करून काळे यांच्याकडे हे पद पुन्हा सोपविण्याचे आदेश दिले आहेत.