पुणे : ऐन दिवाळीचा उत्सव सुरू असतानाच सराईताने अवघ्या ५०० रूपयांसाठी तरूणाचा जीव घेतल्याची घटना खराडीत घडली आहे. संबंधित तरूणाने सराईताच्या खिशातून गुपचूपरित्या ५०० रूपये काढून घेतले होते. त्याच रागातून सराईताने तरूणाच्या डोक्यात, हातावर, नाकावर बांबूने मारहाण करून खून केला आहे. ही घटना ८ ते ९ नोव्हेंबर कालावधीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश रवींद्र पाटील (वय २२, रा. केसनंद) असे आरोपीचे नाव आहे. किरण अशोक साठे (वय २४ रा. खराडी ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि लोकेश ८ नोव्हेंबरला खराडीत होते. साठे पाटीलचा मित्र होता. दोघांना दारूचे व्यसन होते. साठेने दारूच्या नशेत पाटील याच्या खिशातून पाचशे रुपयांची नोट चोरली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. पाटीलने साठेला बांबूने बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साठेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान किरणचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत.