ठाणे : डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथील जयेश म्हात्रे यांच्या मालकीच्या जमिनीवर राधाई नावाची सात माळ्याची बेकायदा इमारत उभारणाऱ्या श्री स्वस्तिक होम्सचे विकासक मयूर रवींद्र भगत यांच्यावर जयेश यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात विकास करारानाम्याशी संबंधित संजय विष्णू पाटील, सचीन विष्णू पाटील, राधाबाई विष्णू पाटील, सुरेश मारूती पाटील यांचीही चौकशी करण्याची मागणी जयेश यांनी तक्रारीत दाखल केली आहे. दरम्यान, मंगळवारी बेकायदा इमारत तोडण्यास पालिका, पोलीस पथकाला विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची यादी जयेश यांनी मानपाडा पोलीस आणि मुंबई उच्च न्यायालयाला देण्यासाठी तयार केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
पोलिसांनी सांगितले, जयेश म्हात्रे आणि त्यांच्या बंधूंच्या नावे डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथे असलेली ३४ गुंठे वडिलोपार्जित जमीन श्री स्वस्तिक होम्सचे विकासक मयूर रवींद्र भगत यांनी हडप करून सात माळ्याची बेकायदा इमारत तीन वर्षापूर्वी उभारली. ही इमारत उभारताना कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट बांंधकाम परवानग्या तयार करण्यात आल्या. जयेश यांच्या तक्रारीवरून पालिकेने राधाई इमारत अनधिकृत घोषित केली होती. चार वर्षाच्या कालावधीत ही बेकायदा इमारत पालिकेकडून तोडण्यात आली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. या जमिनीशी संबंध नसताना भूमाफिया मयूर भगत यांनी जयेश यांच्या जमिनीचा विकास करारनामा संजय पाटील, सचिन पाटील आणि राधाबाई पाटील यांच्या बरोबर केला. या प्रकरणात सुरेश मारूती पाटील यांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवून जयेश यांनी या चारही जणांची चौकशीची मागणी तक्रारीत केली आहे. राधाई इमारतीची बांधकाम परवानगीची कागदपत्रे खरी आहेत असे कल्याण मधील दस्त नोंंदणी अधिकाऱ्यांना दाखवून भूमाफिया मयूर यांंनी बेकायदा बांधकामांचे दस्त नोंदणीकरण बंद असताना, मे,जून २०२२, जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत राधाई मधील सदनिका ११ जणांना दस्त नोंंदणी पध्दतीने विकल्या आहेत. मयूर भगत आणि इतरांनी जयेश यांची वडिलोपार्जित जमीन हडप केली. या जमिनीवर बेकायदा इमारत उभारून सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीदारांना विकल्या. तसेच, शासनाची फसवणूक केली म्हणून जयेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीमुळे राधाई इमारती लगतच्या सहा बेकायदा इमारतींचे भूमाफिया अडचणीत येणार आहेत.
राधाई बेकायदा इमारत तोडण्यास विरोध करणाऱे भाजपचे नंदू परब, संदीप माळी, मनीषा राणे, सचीन म्हात्रे, रामचंद्र माने, भारती गडवी, आकाश वरपे, रतन पुजारी, राजेश गुप्ता, बब्लू तिवारी, करिश्मा, जयश्री आगणे, दत्ता माळकर, राजन आभाळे, पेणकर आणि इतर ३० भाजप कार्यकर्त्यांची यादी याचिकाकर्ते जयेश यांंनी मानपाडा पोलीस, मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी तयार केली आहे. राधाई इमारत भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे पालिकेला तोडता आली नाही. भाजप कार्यकर्त्यांवर न्यायालय, मानपाडा पोलिसांंकडून कारवाईसाठी प्रयत्नशील आहे. – जयेश म्हात्रे, याचिकाकर्ता.