मुंबई : विधानसभा निवडणुकांचा जो निकाल लागलाय तो कुणालाच मान्य नाही. देशभरातून त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ७६ लाख मते वाढली कशी. कुठून आली ही ७६ लाख मते. पाच वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत ही मते कशी आणि कुठून आली. हरयाणातही अशीही मते वाढली होती. महाराष्ट्रातही पाचनंतर ७६ लाख मते वाढली. याचा हिशोब लागत नाहीये. हीच ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार आहेत. ७६ लाख मते कुठून आली. नाना पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला. तोच आमचाही प्रश्न आहे.’ असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले, ‘रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं. साडेअकरा वाजेपर्यंत कोण मतदान करवून घेत होत. हरयाणात १४ लाख मते वाढली तिथे तिथे भाजपचा विजय झाला. महाराष्ट्रात ७६ लाख मते वाढली इथेही महायुतीचा विजय झाला. हा विजय खरा नाही. बाबा आाढाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. आता महाराष्ट्रही हळूहळू त्यांच्यात सहभागी होईल. या राज्यातली लोकशाही, समाजव्यवस्था धोक्यात आहे. या देशातील निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. पुण्यात बाबा आढाव गेल्या दोन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. शरद पवारांनी आज त्यांची भेट घेतली. दिल्लीतील लोकही त्यांची भेट घेणार आहेत. पण हे चित्र गंभीर आहे, महाराष्ट्रासाठी हे गंभीर आहे.
निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही. न्यायालयाने जनतेचं म्हणणंच ऐकलं नाही तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कशासाठी झाली. तुम्ही इव्हीएमची याचिका दोन मिनिटात धुडकावून लावता, हा कोणता न्याय झाला, किमान आमचं ऐकून तरी घ्या, लोक रस्त्यावर उतरले आहेत. एरव्ही तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो. तुम्ही सुमोटो कारवाई करता. आणि या प्रकरणात काय सांगता, सर्वोच्च न्यायालय म्हणते, ज्यावेळी तुमचा विजय होतो. त्यावेळी तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि तुमचा पराभव झाल्यावर तुम्ही आमच्याकडे येता. पण असं कधीही झालेलं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.