ठाणे : चंदनवाडीतील नुरी बाबा दर्गा रोड लगत पार्क केलेल्या ०३ चारचाकी वाहनांसह एका ऑटोरिक्षावरती आणि महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवरती पिंपळाचे मोठे झाड पडले. या घटनेत दोन वाहनांसह महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीचे मोठे नुकसान झाले असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना सकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. तर, तातडीने ते झाड कापून एका बाजूला करण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. चंदनवाडी परिसरात मोठे पिंपळाचे झाड गाड्यांवर आणि महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवर पडल्याची माहिती राजेश मोरे नामक इसमाने ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. तातडीने घटनास्थळी वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी, रुपेश मलबारी आणि ऋषिकेश पवार यांच्या चारचाकी वाहनांवरती झाड पडल्यामुळे त्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, ०१ कार आणि ०१-ऑटो रिक्षा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांच्या मदतीने झाडाखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवरती झाड पडल्यामुळे इलेक्ट्रिक डीपी तुटून नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.