पुणे : पुणे शहरामधील अपघातांचे सत्र काही थांबत नसल्याचे दिसत आहे. शहरातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला गेला. त्यानंतरही शहरामध्ये अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्याच्या घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांविरोधात आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघनं करताना पकडल्यास त्यांच्याकडील वाहन एका वर्षासाठी रस्त्यावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे.
तसेच संबंधित मुलाला २५ वर्षापर्यंत वाहन परवाना दिला जाणार नाही. याबाबत वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीने पुढचे पाऊल उचलले जाणार असून यामध्ये अल्पवयीन मुलांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांना एक वर्षासाठी रस्त्यावर येऊ दिले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहन दिल्याने मोठ्या दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.