मुंबई : बँकेचे १४९ कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फसवणूक केल्याप्रकरणी मे. असोसिएट्स हाय प्रेशर टेक्नोलॉजीज कंपनीचे अध्यक्ष मनोहरलाल सत्रमदास अगिचा यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. अगिचा यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. चौकशीत बनावट कर्ज व लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून कर्जाची रक्कम इतरत्र वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ईडीने याप्रकरणी मुंबई, पुणे, कांडले, अहमदाबाद आदी ९ ठिकाणी छापे टाकले होते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र इसरानी यांना ८ ऑगस्ट २०२३ ला ईडीने अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यापासून आरोपी मनोहरलाल अगिचा ईडीपुढे हजर झाले नव्हते. त्यांना अनेक समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतरही ते चौकशीला उपस्थित राहिले नाही. ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी अगिचा आपली ठिकाणे बदलत होते. त्यांच्या मोबाइलमधील सिम कार्ड बदलत होते. याबाबत तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास केला असता आरोपी अगिचा पुण्यातील रहिवासी सदनिकेत असल्याची माहिती ईडीला मिळाली. त्या माहितीच्या आधारे छापा टाकून शुक्रवारी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली.
युनियन बँक ऑफ इंडियाचे १३४ कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील असोसिएट्स हायप्रेशर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. व तिच्या संचालकांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्या वेळी सीबीआयने मुंबईत सहा ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. गुजरातमधील गांधीधाम येथील या कंपनीचे संचालकरामचंद इस्रानी, मो. फारुख सुलेमान दर्वेश, श्रीचंद अगिचा, इब्राहिम दर्वेश, मनोहरलाल अगिचा, सतीश अगिचा व अनोळखी कर्मचारी यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपींनी युनियन बँक ऑफ इंडियाचे १४९ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे पुढे निष्पन्न झाले होते. आरोपींनी बँकेकडून घेतलेले फंड इतर ठिकाणी वळल्याचा आरोप आहे. त्यांनी कर्जाच्या नियमांचा भंग करून बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.