कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ३६० कोटींची २४ काँँक्रीट रस्त्यांची आणि पालिकेतर्फे सात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील सुरू असलेली आणि प्रस्तावित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा आणि प्रवाशांना पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होणार नाही असे नियोजन करा, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पालिका, एमएमआरडीए अधिकाऱ्यांंना पालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत दिले. विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. एमएमआरडीएची सर्वाधिक कामे पालिका हद्दीत सुरू आहेत. ही कामे करताना अनेक वेळा प्रवाशांना वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. नोकरदार वर्ग, शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता सुरू असलेली काँँक्रीट रस्ते कामे, इतर रुंदीकरणाची कामे लवकर पूर्ण करा, असे आदेश आयुक्त डाॅ. जाखड यांनी अधिकाऱ्यांना दिले. टिटवाळा ते हेदुटणे बाह्य वळण रस्ते मार्गातील दुर्गाडी किल्ला, गोविंदीवाडी ते मोठागाव या तिसऱ्या टप्याच्या कामातील भूसंपादन आणि अतिक्रमणे, इतर अडथळे दूर करून हे काम गतीने सुरू करा. पालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने हे काम पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
महानगर गॅसकडून डोंबिवलीत विविध भागात वाहिनीव्दारे गॅस पुरवठा करण्यासाठी सोसायट्यांमध्ये वाहिका टाकण्याची कामे केली जात आहेत. ही कामे करताना महानगर गॅसचा ठेकेदार मनमानेल तशी खोदाई करतो. सोसायटी आवारात वाहिका टाकण्यासाठी केलेले खोदकाम, तोडकाम सुस्थितीत न करता निघून जात असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेत दाखल झाल्या आहेत. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ठेकेदाराला ही कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना करावी, असे आयुक्तांनी सूचित केले. रोहित्र स्थलांतर, मल, जल निस्सारणाची शहराच्या विविध भागात सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करा. पावसाळा सुरू झाल्यानंतर कोणतेही काम सुरू राहणार नाही याची काळजी घ्या, असे आयुक्त जाखड यांंनी अधिकाऱ्यांना सांंगितले. या बैठकीला पालिका शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंंता अर्जुन कोरगावकर, कार्यकारी अभियंता अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, पालिकेचे कार्यकारी अभियंता मंगेश सांगळे, जगदिश कोरे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, उपायुक्त प्रसाद बोरकर, रमेश मिसाळ, साहाय्यक आयुक्त, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपस्थित होते.
पालिका हद्दीत सुरू असलेली, प्रस्तावित असलेली सर्व काँक्रीट रस्ते कामे आणि इतर विभागांची कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्वी पूर्ण करा. पावसाळ्यात प्रवाशांना या कामांंमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.