मुंबई : मध्य रेल्वेने पर्यटकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सध्या केवळ अमन लॉज ते माथेरान रेल्वेसेवा सुरू आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे माथेरान ते अमन लॉज सेवा बंद करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्यांना मुंबईलगत पर्यटनासाठी हा आणखी एक पर्याय असणार आहे.
मुंबईपासून तासा-दिड तासाच्या अंतरावर माथेरान स्थानक आहे. नेरळ ते माथेरान, अमन लॉज ते माथेरान अशा दोन मार्गावर मिनीट्रेन धावते. जून ते ऑगस्ट दरम्यान मिनीट्रेनमधून एक लाख १३ हजार ८८७ प्रवाशांनी प्रवास केला. तीन महिन्यात रोज सरासरी एक हजार २६५ प्रवाशांनी मिनीट्रेनमधून फेरफटका अनुभवला. जूलै महिन्यात सर्वाधिक तीन हजार ८०२ प्रवाशांनी प्रवास केला. मिनीट्रेनच्या प्रथम श्रेणीतून दहा हजार ४०७ आणि सामान्य श्रेणीतून एक लाख तीन हजार ४८० प्रवाशांनी मिनीट्रेनमधील प्रवास अनुभवला आहे. याच कालावधीत १६ हजार ७४९ पॅकेजसची मालवाहतूक केली आहे.