ठाणे : देशातील १५ ते २९ वयोगटातील युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पाची सखोल माहिती मिळावी आणि राष्ट्र उभारणीच्या धोरणात्मक चर्चेत त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय भारत’ (MY Bharat) संस्थेमार्फत ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण देशभरातील निवडक १७ विभागीय केंद्रांपैकी एक केंद्र म्हणून ठाणे जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये हा विशेष सोहळा पार पडणार आहे. या उपक्रमाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्रश्नोत्तर फेरीत सुमारे १२ लाख युवकांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी १.६३ लाख युवक निबंध फेरीसाठी पात्र ठरले आणि ३० केंद्रीय विद्यापीठांमार्फत झालेल्या मूल्यांकनानंतर प्रत्येक राज्यातील सर्वोत्तम २७ टक्के युवकांची राष्ट्रीय स्तरावरील संवादासाठी निवड करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपवल्या असून, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना अनुक्रमे आभासी संवाद व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि व्यापक प्रसिद्धीची जबाबदारी दिली आहे. कार्यक्रमाचा मुख्य टप्पा १३ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार असून, या दिवशी दुपारी ४:०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने (Virtual) उपस्थित राहून युवकांशी थेट संवाद साधणार आहेत. या संवाद सत्रात निवडक ५ सहभागी युवकांना थेट विचार मांडण्याची संधी मिळणार असून त्यानंतर पंतप्रधान महोदय देशाला संबोधित करतील. याच दिवशी सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या वेळेत ‘विकसित कृषी’ आणि ‘मानवी भांडवल: शिक्षण व रोजगार’ या विषयांवर तज्ज्ञांच्या उपस्थितीत विभागीय स्तरावर चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण उपक्रमाच्या समन्वयासाठी ‘माय भारत’चे राज्य संचालक अमित पुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, हा उपक्रम युवकांसाठी प्रशासकीय आणि धोरणात्मक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

