पुणे : परिसरातील मोशी येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळेत विद्यार्थिनींनी एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत ‘विद्यार्थी बँक’ सुरू केली आहे. ‘आजची छोटी बचत, उद्याचा मोठा आधार’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या या उपक्रमानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. लहान वयातच बचतीची सवय लागावी, पैशांचं योग्य नियोजन समजावं आणि आर्थिक साक्षरता वाढावी, या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं शाळेकडून सांगण्यात आलं आहे. या विद्यार्थी बँकेच्या माध्यमातून विद्यार्थिनी स्वतःची बचत खाती उघडत असून प्रत्येकाला स्वतंत्र खाते क्रमांक देण्यात आला आहे. ठेवी स्वीकारणं, पैसे काढणं यांसह सर्व व्यवहार विद्यार्थिनी स्वतः हाताळतात. शाळेतच छोटेखानी बँकिंग व्यवस्था उभारण्यात आली असून पासबुक, पावत्या आणि व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी आवश्यक रजिस्टर तयार करण्यात आलं आहेत. सर्व व्यवहार शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पार पाडले जातात. या उपक्रमाबाबत माहिती देताना वर्गशिक्षिका रुपाली घोडेकर यांनी सांगितलं, ”विद्यार्थी बँकेसाठी सुरुवातीला योग्य विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना विशेष मार्गदर्शन करून बँकेचे व्यवहार कसे करायचे याचं प्रशिक्षण देण्यात आलं. प्रत्यक्ष बँकेप्रमाणे ताळेबंद स्वरूपात रजिस्टर ठेवलं जातं. विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र पासबुक तयार करण्यात आलं असून पैसे जमा करताना आणि काढताना बँकेच्या स्लिप्सचा वापर केला जातो.”
त्या पुढे म्हणाल्या, ”या बँकेचे सर्व व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केले जातात. आठवड्यातील सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी बँकेचे कामकाज चालते. या काळात विद्यार्थिनी आपली बचत जमा करतात किंवा आवश्यकतेनुसार पैसे काढतात. त्यामुळे त्यांना नियमित व्यवहार करण्याची सवय लागते.” या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये बचतीची सवय लक्षणीयरीत्या वाढली आहे. खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांमधून काही रक्कम बाजूला ठेवून ती बँकेत जमा करण्याची सवय त्यांनी लावली आहे. गरज भासल्यास त्या स्वतः पैसे काढून त्याचा योग्य उपयोग करतात. या बचतीतून त्या पेन्सिल, खोडरबर, कंपास यांसारख्या शालेय वस्तू स्वतः विकत घेतात, त्यामुळे अशा वस्तूंसाठी पालकांकडे हट्ट करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये बचतीची सवय तर वाढलीच आहे, शिवाय जबाबदारीची जाणीव, आत्मविश्वास आणि आर्थिक व्यवहारांचं प्राथमिक ज्ञानही विकसित होत आहे. बँकिंगची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्यानं त्या अधिक सजग आणि शिस्तबद्ध बनत आहेत. पालकांकडूनही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आपल्या मुलींना लहान वयातच आर्थिक शिस्त लागावी आणि पैशांचे महत्त्व समजावं, यासाठी पालक सहकार्य करत आहेत. खाऊचे पैसे दिल्यानंतर ते मुलींच्या खर्चाबाबत माहिती घेतात आणि बँकिंग व्यवहारावर चर्चा करतात. त्यामुळे घरच्या घरीही आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात असून विद्यार्थिनींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहे. लहान वयातच बचत आणि नियोजनाची सवय लावणारा हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरत आहे. एकंदरीत, मोशी येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळेतील ‘विद्यार्थी बँक’ हा उपक्रम केवळ एक कृती न राहता आर्थिक साक्षरतेचा प्रभावी धडा ठरत आहे. हा उपक्रम इतर शाळांसाठीही आदर्श ठरू शकतो. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम अधिक शाळांमध्ये राबवले गेले, तर विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जाण आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

