मुंबई : मराठा आरक्षणासाठी मागच्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे. ‘सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो’, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांच्या उपोषणावरून राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेला येत असताना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमधला संवाद रेकॉर्ड झाला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यावरून राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं आहे.काय म्हणाले राज ठाकरे?’श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं.
पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे.गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा.सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो’, असं राज ठाकरे म्हणाले.व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरणहा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माध्यमांसोबत चर्चा करायला आलो. चर्चा करायला येत असताना आम्ही बोलत येत होतो, बैठकीत ज्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली त्या मुद्द्यावरच बोलूया, आज कोणतेही राजकीय प्रश्न नको, अशी आमच्यात चर्चा सुरू होती’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक पुढचे मागचे शब्द काढून मराठा समाजात संभ्रम निर्माण होईल, हे दाखवण्याचा प्रयत्न विघ्नसंतोषी लोक करत आहेत’, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.